मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

मुंबई : वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षाला आणि स्वतःला अडचणीत आणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा एकदा एक वक्तव्य चर्चेत आले आहे. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील ( Chandrakant patil) यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांच्या जे पोटात आहे ते ओठात आल्याचे दिसून येत असून चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आल्याचं बोललं जात आहे.

पनवेलमध्ये आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे आपल्याला दुःख झाले. परंतु, एवढं मोठं दुःख पचवून आपण सर्व जण पुढे गेलो ओहोत, अशी खदखद चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले,  मागील अडीच वर्षात राज्यात काय परिस्थिती आहे हे सर्वांनीच पाहिलं. ही परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. राज्यात सत्ता बदल झालाही. सत्ता बदल होत असताना योग्य मेसेज देईल अशा व्यक्तीची गरज होती. परंतु, असे असताना देखील आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले आहे. परंतु, हे दु:ख पचवून पुढे गेलो आहोत.