त्यांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे – शरद पवार

पुणे – वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षाला आणि स्वतःला अडचणीत आणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा एकदा एक वक्तव्य चर्चेत आले आहे. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांच्या जे पोटात आहे ते ओठात आल्याचे दिसून येत असून चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आल्याचं बोललं जात आहे.

पनवेलमध्ये आज भाजपच्या (BJP) राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे आपल्याला दुःख झाले. परंतु, एवढं मोठं दुःख पचवून आपण सर्व जण पुढे गेलो ओहोत, अशी खदखद चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, उत्तर दिलं. त्यानंतर हसत दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या पत्रकारांकडे पाहत, त्यांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं पवार म्हणाले.