चंद्रकांत पाटील यांना हे सरकार असंविधानिक आहे याची पूर्ण कल्पना आहे – राष्ट्रवादी

शिंदेसरकारचे भविष्य सुप्रीम कोर्टामध्ये केलेली याचिका आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून

 मुंबई   – शिंदेसरकार (Shinde Sarkar) बेकायदेशीर आणि असंविधानिक पद्धतीने तयार झाले आहे असे लोकांची धारणा असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हे सरकार चालणार नाही म्हणूनच भाजपने आपल्या मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे व येणाऱ्या काळात भाजप आपल्या मनावर ठेवलेला हा मोठा दगड कधी दुसर्‍याच्या गळयात बांधून कुणाला बुडवेल? हे लवकरच पहायला मिळेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (State Chief Spokesperson of NCP Mahesh tapase ) यांनी लगावला आहे.

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायला लागले आहे असे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलले याचा अर्थ त्यांना हे सरकार असंविधानिक आहे याची पूर्ण कल्पना आहे अशी जोरदार टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदेसरकारचे भविष्य सुप्रीम कोर्टामध्ये केलेली याचिका आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले. दरम्यान महाराष्ट्रातील या राजकारणावर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येईल त्यावर महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे असेही महेश तपासे म्हणाले.