‘वा रे अंध भक्ता, तूच करू शकतो मुद्दाम असले प्रकार…’

पुणे : मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रतिप्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत केला. शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत अजित पवार बोलत होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या एकाने मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना जाब विचारताच अजित पवार यांचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले.

प्रेक्षकांमधील एका व्यक्तीकडून मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी त्या व्यक्तीला खाली बसायला सांगितले. काही वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यानंतर अजित पवार चिडले. तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का असा प्रतिप्रश्न करत त्या व्यक्तीला अजित पवारांनी खडसावले.

या प्रकारावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘वा रे अंध भक्ता ,तूच तूच करू शकतो मुद्दाम असले प्रकार… शिवजयंती ,ती साजरी करताना उपमुख्यमंत्री अजित दादा बोलताना मुद्दाम कोर्टात प्रलंबित असलेला मराठा आरक्षण बद्दल विचारणार हा केंद्रीय अन्न महामंडळ सल्लागार विभागातील सदस्य आणि भाजप कार्यकर्ता आणि तो ही तुळजापूरचा आहे. महाशय आरक्षण प्रत्येकाला हवे, संविधानानुसार मिळणार पण सत्तेच्या लालसेसाठी काहीही करणारे भाजपच्या अजून खेळ्या चालूच की भाजप सत्तेत असताना का नाही दिले आरक्षण, अरे सत्तेसाठी अजून किती खेळ्या तरीही नाही येत सत्तेत बरं का… मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण सगळेच आरक्षण प्रलंबित असताना तेवढा इम्पीरिकल डेटा जरी दिला असता तरी महाराष्ट्रातील जनतेला समाधान झाले असते. असो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या वेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करण्याऐवजी भाजप पदाधिकारी पक्षाची नीच खेळी सोडत नाही हे पुन्हा स्पष्ट झालेच’. असा घणाघात रुपाली पाटील यांनी केला आहे.