मी मूर्ख आहे का? डॉक्टर आहे, पीएचडी होल्डर आहे – तानाजी सावंत

पुणे – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी हाफकिन बाबत काही वादग्रस्त वक्तव्य केल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. याबाबत बोलताना आता सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. मी मूर्ख आहे का? मी डॉक्टर आहे, पीएचडी (PHD) होल्डर आहे तसंच रँकर आहे. मीडिया मुद्दाम मला टार्गेट करून दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) घडलेला प्रसंग एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरु आहे. याबद्दल छापून आलेली बातमी सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाल्याने सावंत यांच्यावरती टीका सुरू झाली. या सर्व प्रकरणावर आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी ससून रुग्णालयात हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायचा बंद करा, असा आदेश दिला. त्यावेळी त्यांच्या पीएकडून त्यांना हाफकिन ही संस्था असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मंत्री तिथून निघाले,’ असं एक वृत्त सर्वत्र व्हायरल होत आहे.

हापकिन कोण आहेत हे मला माहिती नसल्याचं मीडियानं दाखवलं. मी ग्रामीण भागातील आहे. मी जर एखादी गोष्ट ग्रामीण भागातील म्हणालो, तर मीडिया माझ्या मागे फिरणार नाही. हे जनतेच्या मनातले सरकार आणले आहे. हे टाकाऊ सरकार नाही. मीडियाने टीका करायची आणि आम्ही ऐकायचं असं होणार नाही. यापुढे आमच्या कामातून सडेतोड उत्तरं मिळतील. राज्यभरात वैद्यकिय क्षेत्रात असलेले अनेक प्रलंबित प्रश्न एका महिन्यांच्या आत मार्गी लावणार असल्याचं आश्वासन सावंत यांनी दिलं असल्याचं टीव्ही 9 मराठीने आपल्या बातमीत म्हटलं आहे.