चरणजितसिंग चन्नी असणार पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; सिद्धूंचा पत्ता झाला कट

चंडीगड – गेल्या अनेक दिवसांपासून पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. अखेर काल (रविवार) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत केला आहे. काँग्रेसकडून विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा, याबाबत पक्षाने आपले नेते व कार्यकर्ते यांच्याकडून कौल घेतला होता, तसेच ऑटोमेटेड कॉल सिस्टिमद्वारे लोकांची मतेही जाणून घेतली होती. सिद्धू यांनी नुकतेच वक्तव्य केले होते की, वरिष्ठ नेत्यांना कमकुवत मुख्यमंत्री पाहिजे आहे. ही थेट पक्षश्रेष्ठींवरच टीका असल्याचे मानले गेले. त्यानंतर सिद्धू यांच्या उपस्थितीतच राहुल गांधी चन्नी यांच्या नावाची घोषणा केली.

चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळाले होते. अखेर काँग्रेस हायकमांडने चन्नी यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा केल्यानंतर चन्नी ट्वीट करुन काँग्रेसचे हायकमांड आणि पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चन्नी यांनी सिद्धू यांना मिठी मारल्याचे पाहायला मिळाले.