पुणे काँग्रेसमध्ये आता काका-पुतण्याची लढाई, भाजपने घर फोडलं !

पुणे – पुणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेसला खिंडार पाडले असून, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि थोर समाजसेवक तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत  पाटील यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे मनपा गटनेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.

पक्ष प्रवेशानंतर पाटील म्हणाले की, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींजीच्या कामामुळे आज प्रत्येकजण भारतीय जनता पक्षाशी जोडला जात आहे. त्यामुळेच भाजपा आज जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. प्रणय शिंदे यांनी संघटन वाढीसह माननीय मोदीजींची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, एखाद दुसऱ्या पक्षांतरामुळे भाजपाचे काहीही नुकसान होत नाही. उलट आगामी काळात शहरातील अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत होण्यास अजून मदतच होणार आहे.

पक्ष प्रवेशानंतर प्रणय शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे विचार आणि माननीय नरेंद्र मोदीजींचे कामामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार. दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर यांनी केली.