मला चिरडायला हत्तीची गरज नाही तर…; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार

सातारा : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्र राजे यांच्यातील राजकीय वैर सगळ्यांना माहिती आहे. साताऱ्यातील पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनी ही शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप उदयनराजेंनी केला. तर कामगारांवर अन्याय करणाऱ्या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देवून चिरडलं पाहिजे, असं वक्तव्य शिवेंद्रराजेंच्या संदर्भात उदयनराजे यांनी केलं आहे. यावर आता शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंवर पलटवार केला आहे.

पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनीत केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे. यावर शिवेंद्रराजेंनी यांनी पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन.

उदयनराजे यांनी केलेले सर्व आरोप शिवेंद्रराजेंनी फेटाळून लावले आहेत. जमीन खरेदी करताना ती पुर्ण कायदेशीर पद्धतीने खरेदी केली आहे. तसेच कारखानदारांकडून हफ्ते घेऊन त्यांना दमदाटी केल्यामुळेच येथे कंपन्या आल्या नाहीत. त्याचबरोबर साताऱ्यातील एमआयडीसी संपायला उदयनराजेच जबाबदार असल्याचंही शिवेंद्रराजेंनी सांगितलं आहे.

एमआयडीसीचे अधिकारी, बँक आणि इतरांना पाठीशीघालून साताऱ्यातील पंडीत ऑटोमोटिव्‍हची जागेत भ्रष्टाचार केला. ४२ कोटींची जागा फक्त आठ कोटींत विकत घेतली. हा भ्रष्टाचार आता उघड झाला आहे. त्यामुळे कारखानदारी करा, परंतु लोकांची योग्य ती किंमत देऊन, असं उदयनराजेंनी नाव न घेता शिवेंद्रराजे यांना म्हटलं होतं.