टीम इंडियातून वगळल्यानंतर पुजाराचा मोठा निर्णय! आता ‘या’ संघाकडून खेळताना दिसणार

India vs West Indies: बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (India Tour Of West Indies) भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. यशस्वी जैस्वाल आणि रुतुराज गायकवाड यांना प्रथमच भारतीय कसोटी संघात बोलावण्यात आले आहे. त्याचवेळी मुकेश कुमार दोन्ही फॉरमॅटच्या संघात आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, कॅरेबियन दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातून अनेक मोठे चेहरे गायब आहेत, त्यात सर्वात मोठे नाव चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये फ्लॉप झालेल्या चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पुजाराची कामगिरी निराशाजनक होती आणि दोन्ही डावात अत्यंत खराब फटके खेळून तो बाद झाला होता. विजेतेपदाच्या लढतीतील फ्लॉप कामगिरीनंतर पुजाराला कसोटी संघातून वगळण्याची मागणी सातत्याने होत होती.

दरम्यान, चेतेश्वर पुजाराने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. तो देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्याचा पश्चिम विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासोबत सूर्यकुमार यादवही पश्चिम विभागाकडून दुलीप ट्रॉफी खेळणार आहे. पुजारा २०१६ मध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाकडून शेवटचा खेळला होता. तेव्हापासून तो बहुतांश वेळ टीम इंडियासोबत कसोटी खेळण्यात व्यस्त होता. त्याने १३ दुलीप ट्रॉफी सामन्यात ९०६ धावा केल्या आहेत.