अहो… अटी कसल्या घालताय….? संभाजीराजेंना सन्मानाने संसदेत पाठवा…! – मनसे

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा राज्यसभेसाठी शिवबंधन (shivbandhan ) हाती बांधण्यास नकार असल्याचे समजते. त्यामुळे आता शिवसेनेकडून उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. सुरूवातीला ज्येष्ठ नेत्यांना या जागेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण आता कोल्हापूरातीलच संजय पवार(sanjay Pawar) हे नाव अचानक चर्चेत आलं आहे.

राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. असं जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, शिवाजी महाराज आणि शाहू महाराज फक्त भाषणात राजकारणासाठी वापरायचे…. पण त्यांच्या वंशजांच्या रूपाने ते देशाच्या सर्वोच्च सभागृहात दिसत असतील तर त्यासाठी थोडा त्याग करायची मात्र यांची तयारी नाही…!अहो… अटी कसल्या घालताय….? सन्मानाने त्यांना संसदेत पाठवा…!! असं त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.