मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोसमधून किती गुंतवणूक आणणार हे आधी जाहीर करावे – राष्ट्रवादी

मुंबई – केवळ मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) हेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी दावोसला जाणार आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यापूर्वीच राज्यात किती गुंतवणूक आणणार आणि महाराष्ट्रात किती रोजगार निर्माण होणार? हे जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे.

शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यापासून राज्याला गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प गमवावे लागले असल्याची टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.

नवीन सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची भावना गुंतवणूकदारांच्या मनात कमी झाली आहे त्यामुळे व्यापारी समुदायामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करून गुंतवणूक मिळवण्यासाठी सरकारने कठोर परिश्रम केले पाहिजेत असेही महेश तपासे म्हणाले.

अंगणवाड्या ताब्यात घेऊन तरुण मनावर प्रभाव टाकण्याची आरएसएसची योजना असून मुख्यमंत्री शिंदे यांनी आरएसएस नियंत्रित जनकल्याण समितीला अंगणवाड्या देण्यापासून दूर रहावे असे आवाहन महेश तपासे यांनी केले आहे. राजकीय हेतूने प्रेरित संस्थांना अंगणवाड्या देण्याच्या हालचालीला अंगणवाडी संघटनांनी विरोध केला आहे, असेही महेश तपासे यांनी सांगितले.