कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘ज्या व्यक्तींचे वय 15 ते 18 वर्षे आहे, त्यांच्यासाठी आता देशात लसीकरण सुरू होईल अशी घोषणा केली आहे. 2022 मध्ये, 3 जानेवारी, सोमवारपासून सुरू होईल. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांबद्दलची चिंता पालकांची चिंता कमी होईल असं ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळातदेखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणतात.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली होती.

याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांनादेखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात.