Dagdusheth Ganapati | वैशाख पौर्णिमेनिमित्त ‘दगडूशेठ’चा शहाळे महोत्सव, गणपती बाप्पांना तब्बल ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

पुणे | श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ( Dagdusheth Ganapati) व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणपती बाप्पांना तब्बल ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

आज पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता प्रख्यात गायक डॉ.अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांचा स्वराभिषेक कार्यक्रम सादर केला. त्यानंतर गणेशयाग होणार आहे. सूर्योदय समयी पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. श्री गणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात.

दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला असतो. त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात.

वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा (Dagdusheth Ganapati ) पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासीयांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी गणरायाला अर्पण करण्यात येतो. तसेच दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप