WPL Auction: महिला आयपीएल लिलावाची ऑक्शनर मल्लिका सागर अडवाणी आहे तरी कोण?

मुंबई: महिला आयपीएल २०२३ (WPL Auction 2023) साठी खेळाडूंचा लिलाव आज म्हणजेच सोमवारी मुंबईत होणार आहे. दुपारी अडीच वाजता लिलावाची सुरुवात होणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या या लिलावात ९० खेळाडूंवर बोली लागण्याची शक्यता आहे. लिलावाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएल लिलावात जिथे पुरुष लिलावकर्त्याची भूमिका बजावत असत, तिथे महिला आयपीएलच्या लिलावात ही भूमिका एक महिला साकारणार आहे. मल्लिका सागर अडवाणी (Mallika Sagar Advani) मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लिलाव करताना दिसणार आहे.

यानिमीत्ताने बीसीसीआय पहिल्यांदाच एका महिला लिलावकर्ताकडे महत्वाची जबाबदारी सोपवत आहे. आयपीएलच्या इतिहासात गेली १५ वर्ष रिचर्ड मेडली आणि ह्यू एडमेडेस आणि चारू शर्मा यांनी लिलावकर्ता म्हणून काम केलं आहे. परंतु पहिल्यांदा कोणी महिला लिलावकर्ती आयपीएलमध्ये दिसणार आहे. त्यामुळे आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की, ही मल्लिका सागर अडवाणी नेमकी कोण आहे?

कोण आहे मल्लिका सागर अडवाणी?
मल्लिका ही मुळची मुंबईची. ती सेंटर फॉर मॉडर्न अँड कंटेम्पररी आर्ट, मुंबई येथे क्युरेटोरियल सल्लागार आहे. ती आर्ट इंडिया कन्सल्टंट्स फर्ममध्येही भागीदार आहे. लिलावकर्ता म्हणून काम करण्याची ही मल्लिकाची पहिलीच वेळ नाही. याआधी मल्लिकाने अनेकदा आर्ट गॅलरीमध्ये लिलावाची जबाबदारी पार पाडली आहे. तसेच तिने प्रो कबड्डी लीग २०२१मध्ये ही भूमिका साकारली आहे.