टांगा पलटी घोडे फरार : गोव्यात काँग्रेसचे अकरा पैकी आठ आमदार भाजपात

पणजी : एकीकडे राहुल गांधी पक्ष मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढत आहेत, तर दुसरीकडे गोव्यात काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ज्याची भीती वाटत होती, ती आता खरी ठरली असून काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
या आमदारांच्या यादीत त्या बड्या नेत्यांचीही नावे आहेत, ज्यांच्यावर एकेकाळी राहुल गांधी आणि काँग्रेस हायकमांडची भिस्त होती.

मायकेल लोबो, दिगंबर कामत, अलेक्सो सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर आणि डेलिला लोबो या आठ काँग्रेस आमदारांनी आज सकाळी विधानसभा संकुलात भेट घेतली आणि काँग्रेस पक्षातून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची त्यांच्या चेंबरमध्ये भेट घेतली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मायकल लोबो, दिगंबर कामत आणि आठ आमदार जुलै महिन्यातच भाजपात प्रवेश करणार होते. तेव्हा, काँग्रेसने कामत आणि लोबो यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. तसेच, काँग्रेसने लोबो यांची विरोधीपक्ष नेते पदावरून हकालपट्टी देखील केलेली.