पालघर हत्याकांडावरून आकांडतांडव करणारे सांगलीत साधूंना मारहाण झाल्यावर गप्प का ?

मुंबई – सांगलीत चोर आणि मुलं पळविणारी टोळीसमजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये असाच काहीसा प्रकार घडला होता. त्या प्रकरणात काही साधूंची जमावाकडून हत्या करण्यात आली होती तर या प्रकरणातील साधू जिवंत आहेत इतकाच काय तो फरक.

दोन्ही घटना या अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह आहेत. तत्कालीन सरकारवर सध्या सत्तेत असणाऱ्या पक्षाने आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला गेला होता. मात्र आज काही निवडक प्रतिक्रिया वगळता कोणताही मोठा नेता यावर एका शब्दाने देखील बोलला नाही.

आज वेगळ्या विचारधारेचे किंवा विरोधकांचे सरकार असते, तर काही संधीसाधूंनी आणि याच स्वयंघोषित धर्माच्या ठेकेदारांनी आकाश पाताळ एक केले असते. मात्र आज ते शांत आहेत कारण त्यांच्या विचारांचे सरकार आहे म्हणून… ? या प्रकरणातील दोषींवर कारवाई करा हे म्हणण्याची सुद्धा आज त्यांना गरज वाटत नाही. हे सिलेक्टिव्ह वागणं योग्य नाही. शिंदे आणि फडणवीस हे संवेदनशील राजकारणी म्हणून ओळखले जातात. आशा आहे या प्रकरणातील दोषींवर कारवाई करतील आणि त्या साधूंना न्याय मिळवून देतील.