कोरेगाव भीमा एल्गार परिषद प्रकरणातील चौघांचा जामीन फेटाळला

मुंबई – राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील हेनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप या चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सामाजिक सौहार्दाला बाधक आणि इतिहासाबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप तसंच भीमा कोरेगाव इथे दगडफेक आणि हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

कोरेगाव भीमा हिंसाचार एल्गार परिषद प्रकरण व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या या चारही आरोपींना जामीन देण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( National Investigative Agency ) विरोध दर्शवला होता. तर या प्रकरणातील सह आरोपी असलेले सुधा भारद्वाज यांना जामीन देण्यात आला असून त्याप्रमाणे जामीन देण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. मात्र, या अर्जाला मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

चार वर्षांपूर्वी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात एल्गार परिषद झाली होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेवर समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला होता. यावेळी दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करुन मोठा हिंसाचार घडवून आणला गेला होता. यामध्ये राहुल फटांगडे या एका तरुणाचा मृत्यू झाला होता.