अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट देशात मोफत मिळाले पाहिजे – रघुनाथ माशेलकर

पुणे  – भारत देशात शेतकरी, गरीब ,कष्टकरी व झोपडपट्टी मध्ये राहणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत .त्यामुळे देशातील उपेक्षित घटकाला अन्न, वस्त्र, निवारा व इंटरनेट मोफत मिळाले तरच भारत देशाचा विकास अधिक गतीने होईल असे मत जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. चैतन्य ग्रुप ने दहावी, बारावी व शालेय विद्यार्थ्याना मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केले होते त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, केवळ शिक्षण महत्त्वाचे नसून त्यापुढे संधी निर्माण करण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे .आपण बारा वर्ष्याचे होईपर्यत परिस्थिती मुळे चप्पल घालू शकलो नाही, मुंबई महापालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. साध्या शाळेत शिक्षण घेतले. आईच्या अपेक्षेने व जिद्द आणि चिकाटीमुळे आज इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ही अतिशय महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी यशस्वी होण्यासाठी पंचसूत्री सांगितली, आशा आणि अपेक्षा उच्च ठेवा, प्रचंड मेहनत घ्या, आपल्यासाठी आपणच स्वतःची नवीन दारे (रस्ते) निर्माण करा, चिकाटी अंगी बाळगा,यशाची आणि उत्तमतेची शिडी चढताना त्याला मर्यादा ठेऊ नका चालत रहा या पाच पंचसूत्री त्यांनी यावेळी सांगितल्या .यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना विविध प्रश्र्न विचारले त्यांनी समजावून सांगत उत्तरे दिली. कार्यक्रमानंतर माशेलकर विद्यार्थ्यानासोबत सेल्फी काढत बराच वेळ रमून गेले होते.

दुसऱ्या सत्रात एमकेसीएल चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी दहावी ,बारावी नंतर उपलब्ध असणाऱ्या विविध संधी व योजनांची माहिती दिली . आदर्श गाव कार्यक्रम चे संचालक पद्मश्री पोपटराव पवार यांनी शेतीसह इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी कसे होता येईल यावर आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर बिव्हीजी ग्रुप चे संस्थापक हनुमंत गायकवाड यांनी उद्योग आणि व्यवसायमध्ये कशी प्रगती करायची याबाबत गुरुकिल्ली दिली व त्याच्या आयुष्यात आलेले अनेक अनुभव मुलांना सांगितले. कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुनिल वारे ,बार्टी च्या निबंधक इंदिरा अस्वार ,सी डॅक चे वरिष्ठ संचालक वसंत अवघडे,माजी पोलीस अधिक्षक के डी मिसाळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे ,नायडू रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुधीर पाटसुते, पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त प्रविण आव्हाड, महेंद्र तूपसौदर, विठ्ठल सोनवणे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते .हा कार्यक्रम संपूर्ण दिवसभर आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व मार्गदर्शक आले होते. या कार्यक्रमास पुण्यासह महाराष्ट्रातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.