गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व जवानांच्या पाठीशी संपूर्ण सरकार – अजित पवार

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृहविभाग, अर्थ विभाग आहेच. परंतू संपूर्ण कॅबिनेट, संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे कार्यक्रमात दिली.

पोलिस विभागातील विविध कार्यक्रमातील सी-६० जवानांच्या सन्मान कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अर्थमंत्री या नात्याने आम्हाला गृहविभागाकडून सी-६० जवानांच्या भत्त्यामधील वाढीचा प्रस्ताव आला होता तो तातडीने मंजूर केला. तसेच यापूर्वी नक्षल भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातही वाढ केली आहे. आता गडचिरोलीत सैन्यदलातील दवाखान्याच्या धर्तीवर सुसज्ज दवाखाना निर्माण करण्यास मंजूरी दिली आहे. आरोग्य प्रतिपूर्ति देयकाच्या यादीत अकरा नवीन आजारांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य व त्यांचे चांगले राहणीमान यासाठी प्रयत्न करु असेही अजित पवार म्हणाले.

यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्रीताई आत्राम व सी-६० जवानांचे पथक उपस्थित होती. सी-६० जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकीत जवानांच्या चांगल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सन्मानीत केले. यावेळी प्रत्येक जवानांशी मंचावर आल्यावर आदराने विचारपूस केली व कौतूकाची थाप मारली.

मर्दीनटोला येथील नक्षल चकमक ही ऐतिहासिक घटना आहे. याची नोंद पंतप्रधानांनी घेतली. मुख्यमंत्री यांनी विशेष कौतूकही केले. राज्यात जिल्ह्यात शांतता अखंड रहावी म्हणून तुम्ही अहोरात्र मेहनत घेता यासाठी मी सर्व सी-६० जवानांना सलाम करतो असे गौरवोद्गार काढले.