धक्कादायक! भाजपचे माजी पदाधिकारी संजय बराटे यांची कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या

Pune- पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे (Sanjay Barate) यांनी त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केली असल्याचे समजत आहे. ते ५६ वर्षांचे होते. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सकाळने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

संजय बराटे (Sanjay Barate Suicide) यांनी त्यांच्या कार्यालयातच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. वारजे एनडीए रस्त्यावर ते राहत असलेल्या इमारतीमध्ये त्यांचे कार्यालय होते. त्या कार्यालायत शुक्रवार संध्याकाळी त्यांच्या पत्नीस ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संजय बराटे भाजपचे माजी पदाधिकारी आणि वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. संजय बराटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, विवाहित बहिणी असा परिवार आहे. वारजे येथील मारुती देवस्थान ट्रस्टचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांनी ट्रस्ट सुरू करून गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. तसेच या ट्रस्टचे राघवदास विद्यालय असून त्याचे ते सध्या अध्यक्ष होते.

हवेली तालुक्याचे भाजपचे १९९५ दरम्यान सरचिटणीस होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी ज्योती यांनी भाजपकडून हवेली पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. त्यांनी २००७ मध्ये महापालिकेची अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते राजकारण सक्रिय राहिले नाही. भय्यू महाराज देशमुख यांचे ते शिष्य होते.