१२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी… ; अनिल देशमुखांना जामीन मिळाल्यानंतर मिटकरींचे लक्ष्यवेधी ट्वीट

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सोमवारी (दि. १२ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपात जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत अनिल देशमुख यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केला आहे. ‘१२० धाडी ,६ वर्षाच्या नातीची चौकशी, कोणतेही पुरावे नसताना केवळ ऐकीव माहितीच्या आधारे सर्व खोटे आरोप झाल्यानंतर राजीनामा देऊन निधळ्या छातीने चौकशीला समोरी जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व निर्भिड योद्धे अनिल देशमुख साहेब आपले अभिनंदन’, असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे नेता सचिन सावंत यांनीही अनिल देशमुख यांना जामिन मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. ‘अनिल देशमुख यांना जामिन मिळाला याचे समाधान आहे. भाजपाच्या विखारी राजकारणाचे ते बळी आहेत. विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व आतच ठेवण्याचा प्रयत्न केला. खूनाच्या आरोपीला माफीचा साक्षीदार व नं १ ला संरक्षण हे गेल्या ८ वर्षांत देशातील विदारक चित्राचा भाग आहे’, असे त्यांनी ट्वीट केले आहे.

कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “ही न्यायव्यवस्थेच्या विजयाची सुरुवात आहे. स्थगिती हा केवळ न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. जेष्ठ नेते अनिल देशमुख साहेबांना आज मंजूर झालेल्या जामीनामुळे ते लवकरच आपल्या सोबत असतील.”

https://twitter.com/ravikantvarpe/status/1602187069446451201

शिवाय राष्ट्रवादी नेता रविकांत वर्पे यांनी अनिल देशमुख यांच्याप्रमाणे नवाब मलिक यांनाही लवकरच जामिन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.