भाभा रुग्णालयातील असुविधांविरोधात माजी नगरसेविका डॉ. सईदा खान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आंदोलन

२३ मागण्यांचे मनपा उपायुक्तांना दिले निवेदन...

मुंबई – कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील (Bhabha Hospital) असुविधांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. सईदा खान यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले.

या आंदोलनादरम्यान औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावा, रुग्णालयात केईएम, नायर, या रुग्णालयाप्रमाणे एमआरआयची सुविधा त्वरीत उपलब्ध करावी, रक्त चाचणी सुविधा २४×७ सुरू ठेवण्यात यावी, दुसरे शस्त्रक्रिया दालन तात्काळ सुरू करावे, शस्त्रक्रिया सकाळी ९ ते १ या वेळेत केली जाते यापुढे ती २४ ×७ केल्या जातील अशी उपाययोजना करावी, कॅथ लॅब सुविधा लवकरात लवकर सुरु करावी, रक्तपेढी सेवा सुरू करण्यात यावी, ईसीजी सेवा दरदिवशी सुरू ठेवावी, मणक्याचे एक्सरे सुविधा उपलब्ध करावी, बर्न विभाग सुरू करण्यात यावा, बाहय रुग्ण विभाग इमारतीच्या मागील शौचालयाची दररोज साफसफाई व्हावी, ईलॅब सुरू करण्यात आलेली असतानाही अतिदक्षता विभागातील रक्त नमुने बाहेर पाठवले जातात, लॅप्रोस्कॉपी यंत्रणा उपलब्ध करण्यात यावी आदींसह २३ मागण्या यावेळी करण्यात आल्या. या विविध मागण्यांचे निवेदन महानगरपालिका उपायुक्तांना (सार्वजनिक आरोग्य) माजी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी दिले.

या आंदोलनात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. सईदा खान, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अरशद अमीर, आयटी सोशल मीडिया सेल अध्यक्षा डॉ. सुरैना मल्होत्रा तालुकाअध्यक्ष सुनील राय, मुंबई महासचिव मुख्लेश शेख, मुंबई सचिव चंदन पाटेकर, जिल्हा महासचिव इक्बाल मलिक, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष हनीफ खान, युवा नेते नदीम कप्तान मलिक, वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र कदम, अमजद खान, मेहबूब पटेल आदी सहभागी झाले होते.