“कसबा मतदारसंघातील बांधकामांना युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या”

माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

पुणे – गावठाण भागातील अनेक वाडे आणि जुन्या सोसायट्यांचा विकास होणे अत्यंत गरजेचे असून युडीसीपीआर नियमावलीमुळे अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या नियमावलीनुसार बांधकाम १५ मीटर उंचीच्या वर गेल्यास एक मीटर साइड मार्जिन सोडण्याची अट घालण्यात आल्याने पुनर्विकसन करताना अडचण निर्माण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रसाने (Hemant Rasne) यांनी या नियमात शिथिलता आणण्यासाठी नुकतीच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत निवेदन देत सविस्तर चर्चा केली.

पुणे शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. पुरातत्व विभागाच्या नियमावलीनुसार या वस्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकाम आणि दुरुस्तीला परवानगी मिळत नाही. शनिवार वाडा परिसरातील अनेक मिळकतींना देखील याचा फटका बसत आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी देखील चर्चा झाली असून त्यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा केला जात आहे. आता या परिसरातील हजारो नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील देवेंद्रना विनंती केली. यावेळी ‘एएमएएसआर’ कायद्यात सुधारणा करण्याचे राज्यसभेत प्रलंबित असणारे विधेयक संमत होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा शब्द त्यांनी दिला.

कसबा मतदारसंघात असणाऱ्या विविध विकासकामांवर देखील यावेळी चर्चा झाली असून राज्य शासनाच्या माध्यमातून निधी देण्याची मागणी देवेंद्रजींकडे केली. या मागण्यांना देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.