दोन जुन्या मित्रांची झाली मध्यरात्री भेट; धनंजय मुंडे – देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने राजकीय चर्चांना आले उधाण

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल शपथविधी झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना राजभवनामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असे मानले जात होते. मात्र भाजपने सर्वांना चकित करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले.

या सर्व घडामोडी घडत महाराष्ट्रातील राजकीय सस्पेन्स संपला असे वाटत असताना आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट पार पडली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

ही कोणत्या नव्या राजकीय अंकाची नांदी आहे, असाही प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. मात्र धनंजय मुंडेंनी या शक्यता फेटाळल्या आहेत. उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आपण फडणवीसांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान या भेटीत नेमकं काय झालं याबाबत खमंग चर्चा सुरु आहे.