“…तर गौतमीताईंना मार खावा लागू शकतो”, छोटा पुढारी घनश्याम दरोडेने दिला इशारा

नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या डान्सबरोबरच वादांमुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडेने (Ghanshyam Darade) गौतमी पाटीलच्या नृत्यावर आक्षेप घेत तिला महाराष्ट्राचा बिहार करु नका असे आवाहन केले होते. आता पुन्हा एकदा घनश्याम दरोडेने गौतमीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. घनश्याम दरोडेने ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील वादावर आपल्या हटके स्टाईलमध्ये भूमिका मांडली आहे.

“गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करतायत. आज गौतमी पाटील स्टार आहेत. पण हे वातावरण किती काळ चालेल? गौतमीताई जेव्हा डाऊन होतील, तेव्हा हे वातावरण बिघडवून डाऊन होतील. गौतमीताईंना मी एक सांगेन, तुम्ही हे चुकीचं करताय. गौतमीताईंनी खूप स्ट्रगल केलाय. मला मान्य आहे. पण गौतमीताईंचा एक तरी कार्यक्रम सुखरुप झालाय का? कुठे दंगल झाली, कुठे दंगा झाला. गौतमीताई स्टेजवर गेल्या आणि सुखरुपपणे बाहेर आल्यात असं कधी झालंय का?” असा प्रश्न घनश्याम दरोडेनं उपस्थित केलाय.

“गौतमी पाटील यांनी त्यांच्या अदा बदलाव्यात”
“पूर्वीच्या कलाकारांचा गौतमी ताईंनी इतिहास पाहावा. सुरेखाताई पुणेकर, मंगलाताई बनसोडे यांची उदाहरणं आहेत. तमाशा ही शेतकऱ्यांसाठी करमणूक आहे. पण गौतमीताईंनी त्याचा अभ्यास केला नाही. त्यांनी कला सादर करावी, नृत्य करावं. पण गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करून मोठं होऊ नये. गौतमीताईंनी त्यांच्या अदा बदलाव्यात”, असा जाहीर सल्लाच घनश्याम दरोडेनं दिलाय.

“…तर त्याला महाराष्ट्र जबाबदार राहणार नाही”
“सोलापुरात गौतमीताई पाटलांचा कार्यक्रम चालू असताना खाली तरुण मार खात होते. याला जबाबदार कोण? गौतमीताई, तुमचा लहान भाऊ म्हणून बोलतोय. तुम्ही विचार करा. आज ही दंगल स्टेजच्या खाली होतेय, उद्या ही दंगल स्टेजवर येईल. ही दंगल स्टेजवर आल्यावर तुम्हालाही आवरता येणार नाही. यामध्ये तुम्हीही मार खाऊ शकता. तेव्हा त्याला महाराष्ट्र जबाबदार नसणार, तुमचे कारनामे जबाबदार असणार. तुम्ही कार्यक्रमातली गर्दी आयोजकांना आवरायला सांगा ना”, अशा शब्दांत घनश्यामनं गौतमी पाटीलला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

“तुमच्या या चाळ्यांमुळे तरुण बिघडायला लागला आहे. त्या दिवशी गौतमी ताईंनी स्टेजवर तरुणाला किस केलं, हे कितपत योग्य आहे? महाराष्ट्राचा बिहार होतोय. गौतमीताई काय लहान नाहीत किंवा आम्ही मोठे नाहीत की ताईंना आम्ही काही सांगावं. पण अश्लील हावभाव करून गौतमीताईंनी मोठं होऊ नये अशी माझी विनंती आहे”, असंही घनश्याम दरोडे म्हणाला.