‘सरकारने संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना फोन केला असता तर सगळे गेले असते’

नवी दिल्ली – दिल्लीतल्या संसदेच्या नव्या वास्तूचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. साधूसंतांच्या मंत्रोच्चारात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. नव्या संसदेचं लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सेंगोल (राजदंड)ची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व धर्मीयांची प्रार्थना पार पडली.

उत्तम वास्तुकलेचा नमुना असणारी ही इमारत देशाच्या समृद्धीचं आणि प्रगतीचं प्रतीक ठरणार आहे. या वास्तुतल्या कार्यालयीन व्यवस्थेत अधुनिक आणि नवीनतम तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे.या वास्तुचा संपूर्ण परिसर 65 हजार चौरस मीटर क्षेत्रात विस्तारला आहे. त्यामध्ये प्रादेशिक कला, सांस्कृतिक वारसा आणि हस्तकला यांचा वापर केला आहे. पुर्वीच्या संसद भवनाच्या तुलनेत तीनपट विस्तार असलेल्या लोकसभेच्या नव्या सभागृहाची आसनक्षमताही वाढली आहे. तिथे 888 आसनक्षमता आहे. राज्यसभेच्या सभागृहाची क्षमता 384 आहे.

दरम्यान, आजच्या या सोहळ्याकडे अवघे लक्ष ठेवून असताना विरोधकांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. आजच्या कार्यक्रमाबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देत सरकावर टीका केली. त्या म्हणाल्या, आम्हाला 3 दिवसांपूर्वी कमिटी मेंबर म्हणून मेसेज आला. लोकसभा, संसद आमच्यासाठी मंदिर आहे. संसदेची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. एरवी बिल पास करायचे असतात तेव्हा मंत्री विरोधी पक्षातील नेत्यांना फोन करतात. मग जर सरकारने आता संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना फोन केला असता तर सगळे गेले असते. हा कार्यक्रम कोणा एका व्यक्तीचा आहे का? , असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

देशाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा दिवस आहे. विरोधीपक्ष जर नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना बोलवायला हवं होतं. जे विरोधी पक्षातील काही खासदार या कार्यक्रमाला गेले आहेत ते नेमके कसे गेलेत तेही पाहणं महत्वाचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. लोकशाहीचे मंदिर माझ्यासाठी जुनी बिल्डिंग आहे. लोकसभेच्या अध्यक्षांना बोलावलं गेलं मग राज्यसभेच्या सभापतींना का बोलावलं नाही? ओम बिर्ला यांनी बोलावले त्यांचं स्वागतच पण उपराष्ट्रपती यांना बोलवायला हव होतं, असंही त्या म्हणाल्यात.