पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) यांच्या पाठोपाठ आणखी एका महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीची वाट धरली आहे. मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे (Jayashree Gajanan Marane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयश्री मारणे या पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजानन मारणे याची पत्नी आहेत.
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि रुपाली पाटील यांच्या नेतृत्वात जयश्री यांनी पक्ष प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्याची प्रतिक्रिया मारणेंनी पक्षप्रवेशावेळी दिली. येत्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मानस जयश्री मारणे यांनी व्यक्त केला. TV9 ने याबाबत वृत्त दिले आहे.
पक्ष नेतृत्व संधी देईल, असा विश्वास मारणेंनी व्यक्त केला.गजा उर्फ गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या आहे. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
मनसे मा. नगरसेविका सौ.जयश्री मारणे यांचा शहर अध्यक्ष प्रशांत भाऊ जगताप ,बंडू भाऊ केमसे, बाबुराव भाऊ चांदरे, दीपक भाऊ मानकर ,सुभाष भाऊ जगताप, अभय भाऊ मांढरे, अजय भाऊ दराडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश …
हि तर फक्त सुरवात आहे …. pic.twitter.com/fjdEePcvN0
— Rupali patil thombare (@Rupalispeak) February 16, 2022