हिंदु जनजागृती समिती राबवणार ‘हलाल मुक्‍त दिवाळी’ अभियान !

पुणे – गेल्‍या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल उत्‍पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्‍यापार्‍यांना व्‍यवसाय करण्‍यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्‍यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्‍पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्‍लिम देशांच्‍या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्‍पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत.

मुळात भारत सरकारच्‍या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्‍था उत्‍पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्‍या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? आज मॅकडोनल्‍ड्‌स, केएफ्‌सी, बर्गरकिंग, पिझ्‍झा हट यांसारख्‍या नामवंत कंपन्‍या हिंदू, जैन, शीख अशा गैर-मुस्‍लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकत आहेत. भारतातील १५ टक्‍के मुसलमान समाजासाठी ८० टक्‍के हिंदु समाजावर हलाल उत्‍पादनांची सक्‍ती आम्‍ही खपवून घेणार नाही. भारताला धर्मनिरपेक्ष म्‍हणायचे आणि धर्माच्‍या आधारावर उत्‍पादनांच्‍या इस्‍लामी प्रमाणिकरणाचा घाट घालायचा, हा काय प्रकार आहे ? या अघोषित हलाल सक्‍तीच्‍या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने यंदाच्‍या दिवाळीत ‘हलाल मुक्‍त दिवाळी’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवणार असल्‍याचे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक सुनील घनवट (Hindu Janajagruti Samiti Maharashtra and Chhattisgarh State Organizer Sunil Ghanwat) यांनी घोषित केले आहे.

ते ‘पुणे श्रमिक पत्रकार संघा’मध्‍ये झालेल्‍या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे   पराग गोखले आणि कोफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेकर्स पुणे डिव्हिजनचे पुणे शहर अध्यक्ष  गिरीश खत्री (Parag Gokhale of Hindu Janajagruti Samiti and Girish Khatri, Pune City President of Confederation of All India Trekkers Pune Division.) हेही उपस्थित होते.

हलाल प्रमाणपत्राची (Halal certificates) सक्ती केल्याने व्यापाऱ्यांनी अजून किती जणांचे प्रमाणपत्र घ्यायचे? व्यापाऱ्यांना होणाऱ्या या त्रासाला जबाबदार कोण ? प्रमाणपत्र सक्ती केल्याने व्यावसायिकांना त्याचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे. तसेच हलाल प्रमाणपत्र सक्तीमुळे जमा झालेला पैसा विधायक कामासाठी वापरला जात नसेल तर हे प्रमाणपत्रे घ्यायचेच कशाला ? असे प्रश्न कोफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेकर्स पुणे डिव्हिजनचे पुणे शहर अध्यक्ष गिरीश खत्री यांनी उपस्थित केले. व्यापाऱ्यांची संघटना हलाल प्रमाणपत्र सक्तीविरोधात असून नागरिकांनीही हलाल प्रमाणित उत्पादने वापरू नयेत असे आवाहन गिरीश खत्री यांनी यावेळी केले.

कोणत्‍याही शासकीय अनुमतीविना चालवण्‍यात येणारी ही ‘हलाल प्रमाणिकरण’ व्‍यवस्‍था तात्‍काळ बंद करण्‍यात यावी, अशी मागणीही समिती करत आहे. या अभियानामध्‍ये भारतात विविध ठिकाणी आंदोलने; ‘हलाल सक्‍ती विरोधी परिषदां’चे आयोजन; पत्रकांचे वितरण; तसेच ऑनलाइन मोहिमा आणि सोशल मिडीया यांच्‍या माध्‍यमातूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्‍यात येणार असल्‍याचे श्री. घनवट यांनी या वेळी सांगितले.

हल्‍दीराम, हिमालया, नेस्‍ले यांसारख्‍या अनेक कंपन्‍या त्‍यांचे शाकाहारी पदार्थ देखील ‘हलाल सर्टिफाइड’ करून विकत आहेत. हलालची ही सक्‍ती का, भारतातील हिंदूंना खाण्‍याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्‍वातंत्र्य का नाही ? त्‍यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्‍पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही हिंदु पद्धतीने ‘हलाल मुक्‍त दिवाळी’ साजरी करावी, तसेच जसा चिनी उत्‍पादनांवर बहिष्‍कार टाकला, तसाच या हलाल अर्थव्‍यवस्‍थेला विरोध करा, असे आवाहन समितीच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. हलाल उत्‍पादनांच्‍या सक्‍तीविरोधात पुण्यात समितीच्‍या वतीने आंदोलन करण्‍यात येणार आहे, असेही घनवट यांनी सांगितले.