सरकार टिकेल किंवा जाईल… पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही – राऊत  

मुंबई : – शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काल महाविकास आघाडी वाचण्याकरिता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा मैदानात उतरले.आमदारांनी बंड केल्यास कार्यकर्ते त्यांच्यामागे जात नाहीत. शिवसैनिक मात्र कायम नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहतात. बंडखोरांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे, असा उघड उघड इशाराच  पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना दिला. गुवाहाटीत बसून बहुमत सिद्ध होत नाही. त्यासाठी मुंबईत या, असंही पवार म्हणाले.

पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांना धमकी दिली आहे. आमदारांच्या केसाला धक्का लावाल तर घर गाठणं कठीण होईल, अशा शब्दात राणेंनी पवारांना लक्ष्य केलंय. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये राणे म्हणतात की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.

 

आता राणेंच्या याच धमकीचा समाचार शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत नारायण राणे आणि भाजपला यांना थेट सवाल विचारला आहे. शरद पवारांना राणेंनी दिलेली धमकी भाजपची भूमिका आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल… पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही.