भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही?; सावंतांची घणाघाती टीका

मुंबई – मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर राज्य शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. ठाकरे सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात आता असंतोष वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत.  खरतर मराठा समाजाच्या मागण्या 15 दिवसात मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे एकंदरीतच सरकारने शब्द पाळला नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, आंदोलनस्थळी जाऊन अनेक भाजप नेत्यांनी संभाजीराजे यांना आपला पाठींबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले,  भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही? मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात जाणारी ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ संस्था भाजपचीच! संभाजीराजे संसदेत बोलण्यासाठी आर्जवे करताना साथ मविआने दिली पण परवानगी नाकारणारी भाजपच! आता मराठ्यांसाठी खोटा कळवळा भाजपचाच! असं म्हणत सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.