आढळराव पाटील, अडसूळ, रामदास कदमांवर शिंदे गटाने सोपविली ‘ही’ जबाबदारी 

मुंबई : मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. यात मोठा पाठींबा हा शिंदे गटाला मिळत असून अनेक नेते शिंदे गटात सामील होत आहेत. यातच आता शिंदे  गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे.

यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या १४ खासदारांसोबत नुकतीच एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन बैठक झाली होती. या बैठकीनंतर नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर कदमांसह आनंदराव अडसूळ यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता शिंदे गटात सहभागी झालेल्या माजी मंत्र्यांवर नव्या कार्यकारिणीत नेते-उपनेतेपदाची खैरात करण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी सर्वात मोठा धक्का ठाकरेंना दिल्याचं दिसतंय.