मनसेसोबत युतीचा प्रस्ताव आल्यास याबाबत चिंतन आणि मंथन होईल – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी केलेल्या भाषणाची चर्चा राज्यभरात रंगलेली असताना किल एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नितीन गडकरी दाखल झाले. यानंतर ११ वाजून ५० मिनीटांच्या सुमारास ते राज ठाकरेंची भेट घेऊन बाहेर पडले.

या भेटीबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बघायची होती. तसेच त्यांनी नवीन घर पहायला मला बोलवलं होतं. म्हणून मी आज त्यांच्याकडे भेटायला आलो. परवा मंगेशकरांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले एकदा घरी या. घर आम्ही नवीन बांधलंय तेही बघाल आणि आईशीही भेट होईल, म्हणून मी त्यांना भेटायला आलो. या भेटीचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. ही पूर्णपणे व्यक्तीगत आणि पारिवारीक भेट होती.असं ते म्हणाले.

दरम्यान,नितीन गडकरींचा कार्यक्रम नियोजित नसताना गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने आता युतीच्या वाटेवर दोन्ही पक्ष निघाल्याच्या चर्चा रंगत आहे. नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांचं घनिष्ठ संबंध आहेत. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत, दोन मित्रांची ही भेट आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल, हे मला माहीत नाही, असे आ. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) म्हणाले आहेत. नितीन गडकरी आणि राज ठाकरेंच्या भेटी अनेकदा झाल्या आहे. मात्र काल राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या समर्थनार्थ भाष्य केलं. आणि गडकरींनी त्यांची भेट घेतली त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या. मात्र युतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव अजून आला नाही. त्यामुळे पुढच्या बैठीकत हा विषय आल्यास याबाबत चिंतन आणि मंथन होईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहे.