जसा रावणाचा जीव बेंबीत होती, तसा भाजपचा जीव मुंबईत आहे – अमोल मिटकरी

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी केलेल्या भाषणाची चर्चा राज्यभरात रंगलेली असताना किल एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली.  राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नितीन गडकरी दाखल झाले. यानंतर ११ वाजून ५० मिनीटांच्या सुमारास ते राज ठाकरेंची भेट घेऊन बाहेर पडले.

या भेटीबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बघायची होती. तसेच त्यांनी नवीन घर पहायला मला बोलवलं होतं. म्हणून मी आज त्यांच्याकडे भेटायला आलो. परवा मंगेशकरांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले एकदा घरी या. घर आम्ही नवीन बांधलंय तेही बघाल आणि आईशीही भेट होईल, म्हणून मी त्यांना भेटायला आलो. या भेटीचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. ही पूर्णपणे व्यक्तीगत आणि पारिवारीक भेट होती.असं ते म्हणाले.

दरम्यान, ही भेट अचानक नव्हती. हे सर्व ठरलेलं होतं, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. राज ठाकरेंनी केलेलं भाषण भाजपची ब्लू प्रिंट होती. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून त्यांना गुजरातला न्यायची आहे. म्हणून राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आगामी काळात यांची अभद्र युती झाली तरी ते घसरून खाली येतील असेही ते म्हणाले. जसा रावणाचा जीव बेंबीत होती, तसा भाजपचा जीव मुंबईत आहे, असाही टोला मिटकरींनी लगावला आहे.