महिलांनी लाटणे घेतले, तर तुमचे खरे नाही; सुप्रिया सुळे यांचा राज ठाकरेंवर निशाणा

अहमदनगर : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीला (NCP) आरसा दाखवल्यापासून संपूर्ण राष्ट्रवादी कामाला लागली आहे. यातच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध राज ठाकरे असा देखील सामना रंगला असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, नुकतेच राज ठाकरे यांना उद्धेशून केलेलं त्याचं एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

‘महाराष्ट्राच्या मातीविरोधात जास्त बोलू नका; अन्यथा महिला लाटणे घेऊन मागे लागतील. त्यांनी लाटणे घेतले तर तुमचे काही खरे नाही,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा झाला. यावेळी त्यांनी राज यांच्यावर नाव न घेता शाब्दिक हल्ला केला.

त्या म्हणाल्या, आपण दोन वर्षांनंतर कोरोना महामारीतून बाहेर पडत आहोत. आता कोठे अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. अशा परिस्थितीत हे समाजात द्वेष पसरवत आहेत. हे स्वत: काहीही कामे करीत नाहीत. केवळ भाषणे करतात. लोकांना देव, धर्मावरून भडकावतात. आपण मंदिरात प्रसन्न मुद्रेने जातो; पण यांचा मंदिरात गेल्यावर चेहरा पहा. त्यावर काहीही हावभाव नसतात.

लोकांसमोर हे मराठीचा मुद्दा मांडतात; पण यांची स्वत:ची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. यांच्या व्यासपीठावर एकही महिला नसते. महिलांना यांच्या पक्षात काहीही स्थान नाही. आपल्या राज्याची संस्कृती ही संतांची आहे. कुणी दगड उचलणार असेल तरी आपण विचारांची लढाईच लढली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.