संजू सॅमसनची जागा घेणारा जितेश शर्मा आहे तरी कोण? आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलाय

श्रीलंकेविरुद्धची 3 सामन्यांची टी20 मालिका (Sri lanka Tour Of India) सुरू असतानाच यजमान भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांतून बाहेर पडला आहे. त्याच्याजागी जितेश शर्मा (Jitesh Sharma) या नवोदित खेळाडूला भारतीय संघात जागा मिळाली आहे. तो पुण्यातील गहुंजे स्टेडियमवरील दुसऱ्या टी20 सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करेल. संजूला रिप्लेस करणारा हा क्रिकेटर नेमका आहे तरी कोण? त्याची यापूर्वीची कामगिरी कशी राहिलीय? यावर एक नजर (Who Is Jitesh Sharma) टाकू…

जितेश आहे वरच्या फळीतील स्फोटक फलंदाज
महाराष्ट्रातील अमरावतीच्या 29 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्माने 2012-13 कूचबिहार ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरीच्या बळावर 2013-14 हंगामात विदर्भाच्या वरिष्ठ संघात प्रवेश केला होता. जिथे त्याने 12 डावात दोन शतके आणि एका अर्धशतकासह 537 धावा केल्या होत्या. त्याने 2013-14 विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले आणि पहिल्या दोन हंगामात विदर्भासाठी केवळ मर्यादित षटकांचे सामने खेळले. त्याने बहुतांशी टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी केली आहे.

आयपीएलमध्ये प्रशंसनीय राहिलाय स्ट्राइक रेट 
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2015-16 मध्ये, जितेश स्पर्धेतील तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 143.51 च्या स्ट्राइक रेटने 343 धावा केल्या होत्या. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीने मुंबई इंडियन्सचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आयपीएल 2016 च्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्सद्वारे 10 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. गेल्या वर्षी तो पंजाब किंग्जकडून खेळला होता. यावेळीही त्याला पंजाब किंग्जने 20 लाखांना विकत घेतले आहे. त्याने 12 सामन्यात 29.25 च्या सरासरीने आणि 163.64 च्या स्ट्राईक रेटने 234 धावा केल्या. यामध्ये 44 धावांच्या शानदार खेळीचा समावेश होता. जितेशने 2015-16 हंगामात रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

टी20 मध्येही चांगलीय राहिलीय कामगिरी
जितेशने 16 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 553 धावा, 47 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1350 धावा आणि 76 टी-20 सामन्यांमध्ये 1787 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 30.28 आहे आणि टी20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 147.93 आहे. त्याची टी20 मधील कामगिरी पाहता त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. अलीकडच्या काळात तो लिस्ट ए मध्ये प्रभावी ठरला नसला तरी कदाचित निवडकर्त्यांनी त्याच्या टी20 कामगिरीच्या आधारे त्याची निवड केली असती.