बारामती जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली; आधी बावनकुळे मग सीतारमण करणार दौरा

पुणे – राज्यात सत्तांतरानंतर आता राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेनेबरोबर (Shivsena) युतीची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली आणि त्यावर चर्चा केली जाईल असं पवार यांनी सांगितलं.

एका बाजूला हे सुरु असताना दुसऱ्या बाजूला पुढच्या लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या भाजपनं (BJP) पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीय केलंय…. त्यासाठी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) ६ सप्टेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यादेखील लवकरच बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या 6 सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत.आगामी बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करणे हा त्यांच्या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असून या दौऱ्यामध्ये त्यांच्या समवेत पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, बाळासाहेब गावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली.