पुन्हा मौका मौका! कट्टर प्रतिद्वंद्वी भारत-पाकिस्तान यंदा पुन्हा भिडणार, जय शहांनी केलीय घोषणा

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील क्रिकेट सामना म्हणजे अवघ्या जगातील क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी. नेहमीच चित्तथरारक अशी लढत या दोन देशांमधील सामन्यांत पाहायला मिळते. त्यामुळे क्रिकेटरसिक मोठ्या आतुरतेने या सामन्याची वाट पाहात असतात. अशातच पुन्हा एकदा कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात. आशिया चषक २०२३ मध्ये (Asia Cup 2023) उभय संघांचा सामना रंगू शकतो, ज्याची सुरुवात यावर्षीच सप्टेंबरमध्ये होणार आहे. याबद्दल आशिया क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष व बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

जय शहा यांनी ट्विट करून पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अंतर्गत, त्यांनी सांगितले आहे की आशिया चषक यावर्षी सप्टेंबरमध्ये खेळवला जाईल. ही स्पर्धा वनडे स्वरूपात खेळवली जाईल. तसेच आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात असतील, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र अद्याप आशिया चषक पाकिस्तानात खेळवला जाईल की इतर ठिकाणी? हे आणखी निश्चित नाही. यानंतर भारतीय संघाच्या यजमानपदाखाली वनडे विश्वचषकही खेळवला जाणार आहे.

यावेळीही आशिया चषक स्पर्धेत केवळ ६ संघ सहभागी होणार असल्याचे जय शाह यांनी ट्विटमधून सांगितले आहे. हे संघ भारत, पाकिस्तान, गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि एक पात्रता संघ असतील. हे सर्व संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत ६ संघांमध्ये एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत.

आशिया चषकात होणार १३ सामने 
यानंतर दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत ४ संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने एकूण ६ सामने खेळवले जातील. यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल. अशा प्रकारे आशिया कप २०२३ मध्ये अंतिम सामन्यासह एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत.