सुडाने पेटलेले महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्र्यांमुळे कोर्टाकडून किती वेळा बेइज्जत होणार? 

मुंबई– गेल्या काही दिवसांपासून शिवसेना(shivsena) विरुद्ध राणा (rana)दांम्पत्य असा वाद पाहायला मिळत आहे. मातोश्री समोर हनुमान चालीसा पठन करण्याचा आग्रह धरणाऱ्या राणा दांम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर आता काल न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवत राज्य सरकारला फटकारलं आहे.

राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही. राणा दांपत्याला जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणांना दिलेल्या जामीनाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली होती. त्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत. राणा दांम्पत्याना अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम 124 A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे.असं मत मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलंय.

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर(atul bhatkalkar) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ठाकरे सरकारला आता बहुधा न्यायालयाच्या थपडा खाण्यासाठी नवा गाल शोधावा लागेल. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर लावलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं आहे असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. सुडाने पेटलेले महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्र्यांमुळे कोर्टाकडून किती वेळा बेइज्जत होणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.