‘अर्जुन आज तू क्रिकेटर म्हणून तुझ्या प्रवासात…’, लेकाच्या आयपीएल पदार्पणानंतर भावूक झाला सचिन

मुंबई- कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रविवारी (१६ एप्रिल) झालेला आयपीएल २०२३मधील २२ वा सामना मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने जिंकला. हा त्यांचा हंगामातील सलग दुसरा विजय होता. हा सामना एका वेगळ्या कारणानेही खास राहिला. कारण या सामन्यातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा (Sachin Tendulkar Son) आणि अष्टपैलू अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यानंतर सचिन भावूक झाला आणि त्याने प्रतिक्रियाही दिली आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमधील पहिला सामना (Arjun Tendulkar IPL Debut) खेळण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो २०२१ पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला होता. पण आता त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनला एकही विकेट मिळाली नाही. परंतु अर्जुनने त्याच्या २ षटकात किफायतशीर गोलंदाजी करत फक्त १७ धावा दिल्या.

आपल्या मुलाच्या पदार्पणानंतर सचिन भावनिक झाला. ट्विट करत त्याने लिहिले की, ‘अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस. तुझ्यावर प्रेम करणारा आणि खेळाची आवड असणारा पिता या नात्याने, मला माहीत आहे की तू खेळाला पुढेही सन्मान देत ​​राहशील.  खेळावर प्रेम कर आणि याच्या बदल्यात खेळ तुझ्यावर प्रेम करेल.’ अशा शब्दांत सचिनने त्याच्या भावना मांडल्या आहेत.