तुम्ही बारामतीला संपूर्ण महाराष्ट्र समजता त्याच काय?, भाजपाने घेतला शरद पवारांचा समाचार

मुंबई: गुजरात विधानसभा निवडणूकांचा (Gujrat Election Result 2022) निकाल भाजपाच्या (BJP) बाजूने लागला आहे. गुजरातमध्ये सातव्यांदा कमळ फुलले असून हा भाजपाचा आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. परंतु गुजरातमध्ये भाजपाची सत्ता येणार यात काहीच शंका नव्हती. मात्र गुजरातचा निकाल म्हणजे देशाचा निकाल नव्हे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केली.

गुजरातची निवडणूक (Gujrat Election Results) एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही. गुजरातचा निकाल म्हणजे देशाचा निकाल नाही, असे शरद पवार म्हणाले.

आता शरद पवारांच्या या वक्तव्यावर भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. खरं आहे, गुजरातचा निकाल म्हणजे देशाचा निकाल होत नाही. पण, गुजरातच्या निकालाने देशाचा मूड स्पष्ट झाला आहे. 2024 ला पुन्हा ‘फिर एकबार मोदी सरकार’, अशा शब्दांत भाजपाने शरद पवार यांचे कान टोचले आहेत. तसेच, शरद पवारजी तुम्ही बारामतीला संपूर्ण महाराष्ट्र समजता त्याच काय? बारामती शहराचा विकास म्हणजे, महाराष्ट्राचा विकास होत नाही, असा टोमणाही भाजपाने यावेळी मारला आहे.