इम्तियाज जलील काय शहराचा बादशाह आहे का? औरंगाबादचं संभाजीनगर होणारच – संजय शिरसाट  

संभाजीनगर : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं. परिणामी सत्तांतर झालं त्यामुळे राहिलेल्या वेळेत ठाकरे सरकारने लोकप्रिय निर्णय घेतला असल्याचे पाहायला मिळाले. याआधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D.B. Patil) यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला संभाजीनगरचा (Sambhajinagar)  विषय मार्गी लावण्यात आला.उस्मानाबाद शहराचं देखील नाव ‘धाराशीव’ (Dharashiv) करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) आक्रमक झालेले दिसून येत आहेत. नामांतराला विरोध करण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. ते म्हणाले, नामांतरणाचा मुद्दा हा हिंदू-मुस्लिमांचा मुद्दा आहे. आम्ही संभाजी महाराजांचा (Sambhaji Maharaj) आदर करतो. पण सत्तेत बसलेल्या पक्षाच्या एका नेत्याने २५-३० वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये येऊन औरंगाबाद शहराचं नामकरण व्हायला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली.

त्या नेत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही नामांतराचा अन्याय सहन का करायचा ? असा प्रश्नही जलील यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे नामांतराच्या मुद्यावरून आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्वपक्षीय बैठकीत बोलताना ते म्हणाले की, माझ्या जन्माच्या दाखल्यावर औरंगाबाद आहे, त्यामुळे माझ्या मृत्यूच्या दाखल्यावर देखील औरंगाबादच असायला हवं. असं ते म्हणाले सोबतच  इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा दिला आहे.

यावर आता, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? असे किती जरी आडवे आले, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच, असे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी म्हटले आहे, ते पत्रकारांशी बोलत होते. इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? कोण इम्तियाज जलील? इथली जनता महत्वाची आहे आणि हा शिवसेना प्रमुखांचा शब्द आहे. संजय राऊतांसारखे (Sanjay Raut) खोटे नाही. संजय राऊत मागे म्हणाले होते, की प्रस्ताव गेला आहे. मग आता प्रस्ताव घ्यायची गरज काय पडली? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.