दिवस फिरले! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात वॉरंट जारी 

इस्लामाबाद  :  इस्लामाबादच्या मरगल्ला पोलिस स्टेशनच्या दंडाधिकाऱ्यांनी पीटीआय प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी (Imran Khan Arrest Warrent) केले आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल 20 ऑगस्ट रोजी खानच्या विरोधात नोंदवलेल्या खटल्यात प्रादेशिक दंडाधिकारी यांनी अटक वॉरंट जारी केले. एफआयआरमध्ये पाकिस्तान दंड संहितेच्या (PPC) चार संबंधित कलमांचा समावेश आहे.

पाकिस्तानी वृत्तानुसार, माजी पंतप्रधान चौधरी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अवमानाच्या आरोपांना सामोरे जात आहेत. न्यायालयाने खान यांना न्यायालयात हजर राहण्याचे वॉरंट बजावले आहे. वॉरंट जारी झाल्यानंतर, पीटीआय नेते असद उमर यांनी सरकारला या निर्णयाचा पश्चाताप होईल असे सांगत खान यांना अटक केल्यास परिणाम भोगावे लागतील अशा आशयाचा इशारा दिला.

दरम्यान, माजी माहिती मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, अशा “कमकुवत” प्रकरणात वॉरंट जारी करणे अर्थहीन आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांनी ट्विटरवर लिहिले की,  निराधार कायदेशीर कलमांवर वॉरंट जारी करून आणि ज्याची गरज नव्हती अशी खोटी केस बनवून मीडियामध्ये एक सर्कस तयार केली गेली आहे, असं म्हटले आहे.