भारताला ४४० व्होल्टचा झटका! हुकुमी गोलंदाज जसप्रीत बुमराह टी२० विश्वचषकातून बाहेर

१६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ पूर्वी (T20 World Cup 2022) भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा हुकुमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे संपूर्ण टी२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. याबरोबरच तो सध्या स्वदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी२० मालिकेतही खेळू शकणार नाही. यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची डोकेदुखी वाढली आहे. भारतीय संघाने १५ वर्षांपूर्वी अर्थात २००७ मध्ये त्यांचा पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता.

बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय संघाचा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. मात्र तो दीर्घ काळापासून त्याच्या कंबरेच्या दुखापतीशी झुंज देतो आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे त्याला सातत्याने क्रिकेट खेळायला मिळत नाहीय. त्याने नुकत्याच मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केले होते. त्याने या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचे २ सामने खेळले होते, ज्यांमध्ये तो चांगल्या लयीत दिसला होता.

मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वी पाठीत दुखापत होत असल्याने तो खेळू शकला नाही. यानंतर आता वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. याबरोबरच तो आगामी टी२० विश्वचषकातही अनुपलब्ध असू (Jasprit Bumrah Ruled Out Of T20WC) शकतो. तो ४-६ महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने ही माहिती दिली आली आहे. मात्र अद्याप बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. बुमराह टी२० विश्वचषकातून बाहेर झाल्यास वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज त्याची जागा घेऊ शकतो.