शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करणे हीच बाबासाहेबांना श्रद्धांजली

पुणे :   यांनी शिवसृष्टीचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करणे, हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज येथे आदरांजली वाहण्यात आली. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि पुण्याच्या महापौरांच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आदरांजली सभा आयोजिण्यात आली होती. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या समारंभात पुण्यातील सव्वाशे संस्थांच्या वतीने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.

राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजमाता कल्पनाराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे, राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे प्रांत संघचालक सुरेश जाधव, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एअर मार्शल (निवृत्त) भुषण गोखले, रिअर अँडमिरल (निवृत्त) जयंत नाडकर्णी, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे यथोचित स्मारक राज्यात होणे अगत्याचे आहे, असे बाबासाहेब मानत असते. त्यातूनच त्यानी शिवसृष्टीचे स्वप्न पाहून त्याच्या उभारणीचा ध्यास घेतला होता. त्यांच्या हयातीत शिवसृष्टीची उभारणी सुरू झाली असली, तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. राज्य व केंद्र शासन त्यासाठी साह्य करेलच. तथापि, समाजाने यासाठी पुढाकार घेणे अगत्याचे आहे. समाजाच्या पुढाकारातून शिवसृष्टी प्रकल्प पूर्णत्वास जावा, असे फडणवीस यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.