२० ते २५ जणांनी माझी छेड काढली, माझ्यावर हल्ला केला, मला मारलं; केतकीने मांडल्या व्यथा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मे महिन्यामध्ये अटक करण्यात आलेली अभिनेत्री केतकी चितळेने (Actress Ketki Chitale) अटकेच्या काळात तिच्यावर झालेल्या कथित अत्याचारांबद्दल भाष्य केलं आहे. केतकीने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केवळ फेसबुकवर एक पोस्ट कॉपी-पेस्ट करुन स्वत:च्या प्रोफाइलवर अपलोड केल्याने मला तुरुंगामध्ये टाकण्यात आल्याचा दावा केतकीने केलाय.

पोस्ट केल्यानंतर काही वेळांनी पोलीस माझ्या दारात उभे होते. त्यांनी मला ताब्यात घेऊन अटक केली. या साऱ्या गोंधळामध्ये २० ते २५ जणांनी माझी छेड काढली, माझ्यावर हल्ला केला, मला मारलं. शाईच्या नावाखाली माझ्यावर विषारी रंग फेकले, माझ्यावर अंडी फेकण्यात आली. केवळ माझ्यावरच नाही तर त्यांनी पोलिसांवरही हे हल्ले केले, असं NDTVला दिलेल्या मुलाखतीमध्ये  केतकीने म्हटलंय.

मी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत पोस्ट केली होती. ते लोकांनी एखाद्या वेगळ्या अर्थाने घेतलं तर मी त्यात काहीही करु शकत नाही. मी केवळ काही यमक जुळवून केलेल्या (पोस्टसाठी) तुरुंगात होते. पवार म्हणजे धर्म नाहीत, असं केतकीने म्हटलं आहे.