ढाण्या वाघाची डरकाळी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; लक्ष्मण जगताप यांची तब्येत ठणठणीत

पिंपरी  –  गेल्या महिन्याभरापासून बाणेरच्या खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेले चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांच्या तब्बेतीमध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. तब्बेतीमध्ये सुधारणा झाल्याने जगताप यांनी आज रूग्णालयाच्या खिडकीत येऊन खाली उभे असलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना हसतमुखाने हात हलवून अभिवादन केले. अंगठा दाखवत मी पूर्णपणे बरा झालो, असल्याचा संदेश दिला.

जगताप कुटुंबाचे सदस्य म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन ते तीन वेळा त्यांची रूग्णालयात भेट घेऊन आस्थेवाईक विचारपूस केली. गेल्या महिन्याभरात प्रसारमाध्यमात वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. शहरातील लाखो लोकांचे प्रेम व पाठींब्यामुळे ते आता ठणठणीत बरे झाले आहेत अशी माहिती त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जातीने लक्ष देवून माजी मंत्री गिरीष महाजन यांना पाठवून F D I परवानगी मिळणे साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांच्या सहकार्याने परराष्ट्र विभागाची परवानगी मिळवली. आदरणीय देवेन्द्रजी फडणवीस यांनी अमेरीकेतून आवश्यक इंजेक्शनचे डोस तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. एकूण १२ इंजेक्शन चा डोस पैकी ८ डोस भाऊंच्या मित्र परिवाराने अमेरिकेतून मागविले होते त्यातील ४ इंजेक्शन फडणवीस साहेब यांनी वैयक्तिक पाठविली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असे दोघेही तब्येतीची माहिती दिवसातून रोज २ वेळा घेत आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व विविध जातीधर्माच्या लोकांनी भाऊच्या आरोग्यासाठी प्रार्थना पूजा अर्चा केली. भाऊच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वपक्षीय अनेक नेत्यांनी जगताप कुटुंबाची भेट घेऊन साथ दिली. डॉक्टरांचे योग्य उपचार, भाऊंची मानसिक इच्छाशक्ती आणि कार्यकर्ते व नागरिकांच्या प्रेमामुळे ते आता बरे झाले आहेत असेही शंकर जगताप म्हणाले.

डॉक्टरांच्या सल्लानंतर त्यांना लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडले जाईल. लवकरच पुन्हा एकदा लक्ष्मणभाऊ राजकारणात सक्रिय होतील असा विश्वास त्यांचे बंधू आणि चिंचवड मतदारसंघाचे निवडणूक संचालन समितीचे प्रमुख शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.