‘या’ ५ अनकॅप्ड क्रिकेटर्ससाठी फ्रँचायझींमध्ये होऊ शकते रस्सीखेच, लागतील कोट्यवधींमध्ये बोली

IPL Auction: इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या हंगामाची आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. आज (२३ डिसेंबर) कोची येथे आगामी हंगामासाठी मिनी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. या लिलावापूर्वी आयपीएलमधील सर्व सहभागी १० फ्रँचायझींनी संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यामुळे सध्या फ्रँचायझींमध्ये बऱ्याचशा जागा रिकाम्या आहेत. अशात लिलावात या जागा भरून काढण्यासाठी नेहमीप्रमाणे फ्रँचायझी प्रतिभाशाली खेळाडूंवर मोठ-मोठ्या बोली लावताना दिसतील. तत्पूर्वी अशा ५ भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर नजर टाकूया, ज्यांच्यासाठी लिलावात फ्रँचायझी हात सोडून पैसे खर्च करताना दिसू शकतात.

विवरांत शर्मा
जम्मू-काश्मीरमधील २३ वर्षांच्या विवरांत शर्माने अलीकडच्या काळात अप्रतिम खेळ दाखवला आहे. टी२० मध्ये त्याने ८ डावात १९१ धावा केल्या आणि ६ विकेट्सही घेतल्या. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर १४ सामन्यात ५१९ धावा आणि ८ विकेट्स आहेत. तो डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.

समर्थ व्यास
२७ वर्षीय समर्थ व्यास आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळवू शकतो. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने २८ टी-२० सामन्यांमध्ये १५१ च्या स्ट्राईक रेटने ६४९ धावा केल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने द्विशतक झळकावले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने ५२ च्या सरासरीने आणि १७७च्या स्ट्राईक रेटने ३१४ धावा केल्या. ७ डावात त्याच्या बॅटमधून २२ षटकार निघाले.

विद्वथ कवेरप्पा
विद्वथ कवेरप्पाचे नाव फार कमी लोकांनी ऐकले असेल, पण हा गोलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये थैमान घालत आहे. त्याने ऑक्टोबरमध्ये कर्नाटकसाठी पहिला टी२० आणि नोव्हेंबरमध्ये पहिला लिस्ट ए सामना खेळला. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने ८ टी-२० सामन्यात १८ बळी घेतले. तर केवळ ८ लिस्ट ए सामन्यात १७ बळी घेतले. विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली या स्पर्धांमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश होता.

शम्स मुलाणी
मुंबईच्या या अष्टपैलू खेळाडूला अद्याप आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड मजबूत आहे. त्याच्या नावावर ४२ लिस्ट ए मॅचमध्ये ५९ आणि ३५ टी-२० मॅचमध्ये ४० विकेट्स आहेत. त्याने टी२० मध्ये ७ पेक्षा कमी इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. याशिवाय तो बॅटनेही उपयुक्त खेळी खेळू शकतो.

नारायण जगदीशन
यष्टिरक्षक फलंदाज नारायण जगदीशन गेल्या मोसमापर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. मात्र यंदा संघाने त्याला रीलिज केले आहे. त्यानंतर त्याची बॅट थांबण्याचे नाव घेत नाहीये. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याच्या बॅटने सलग ५ सामन्यात शतके झळकावली. यात २७७ धावांच्या विक्रमी खेळीचाही समावेश आहे. २७ वर्षीय तामिळनाडूच्या फलंदाजाला लिलावात मोठी बोली लागू शकते.