Loksabha Election | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार!, चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Loksabha Election : लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एकदिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भांडारी, आ. माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, समन्वय समितीचे प्रमुख तथा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशेलकर, शहर प्रमुख प्रमोदनाना भागगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या सह मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय रहावा. प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत, त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता असावी यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बारामती, शिरुर, आणि पुणे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक झाली. या बैठकीत माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये एनडीएला ४०० पार करुन माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं, यावर सर्वांचच एकमत आहे. आजच्या लोकसभा मतदारसंघ (Loksabha Election) निहाय बैठकीनंतर प्रत्येक पक्षाचे नेते विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संपर्क करणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

पाटील पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम हटविण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बूथवर मिळणाऱ्या मतांमध्ये ३७० मते अधिक मिळाली पाहिजेत, अशी सूचना पक्ष श्रेष्ठींनी केली आहे. त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची मतांची संख्या काढली, ती देखील ४०० पार करतील, आणि लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री तथा शिवसेना नेते विजयबापू शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, यांच्या सह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम शेतकरी संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील हे लवकरच बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तालुकानिहाय दौरा करणार असून, याद्वारे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन