‘आदिपुरुष’ सिनेमा पाहायला साक्षात ‘हनुमान’जी आले! थिएटरमध्ये माकडाची एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

Adipurush : ज्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती, तो चित्रपट म्हणजेच ‘आदिपुरुष’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता आणि आज 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशामध्येच एका चित्रपटगृहामध्ये ‘आदिपुरुष’चा शो सुरु असताना एक वेगळीच घटना घडली. चित्रपट सुरु असताना चित्रपटगृहात चक्क माकडाने एन्ट्री केली.

माकड चित्रपटगृहाच्या भिंतीच्या वरच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेतून आतमध्ये आलं. चित्रपट पाहत असलेल्या प्रेक्षकांचं त्या माकडाकडे लक्ष गेलं. त्यानंतर चित्रपटगृहात एकच गोंधळ उडाला. प्रेक्षकांनी शिट्या व टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर जय हनुमान म्हणून घोषणा देण्यासही सुरुवात झाली.

याशिवाय आदिपुरुषच्या टीमने प्रत्येक सिनेमागृहात एक सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर एका सिनेमागृहात राखीव सीटवर हनुमानाची प्रतिमा ठेवून पूजा केली गेली. हळद-कुंकू वाहून प्रतिमेला पुष्प अर्पण करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. प्रसाद म्हणून केळीही दाखवण्यात आल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला आहे.