आता संघात मित्र राहिले नाहीत, सहकारी आहेत, हा एकाकी प्रवास आहे; आर अश्विन असे का म्हणाला

ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) भारतीय संघाला 209 धावांनी निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो रविचंद्रन अश्विनसारख्या (Ravi Ashwin) नंबर वन गोलंदाजाला संघात स्थान न मिळणे. अश्विनला स्थान न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली.

आता अखेर अश्विनने आपल्याला या महत्त्वपूर्ण सामन्यात न खेळवण्याबद्दल मौन सोडले आहे. आता संघात मित्र राहिलेले नाहीत, सहकारी आहेत, असे सूचक वक्तव्य यावेळी अश्विनने केले आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अश्विन म्हणाला की,”आता संघात मित्र नाहीत, सहकारी आहेत. ही अशी वेळ आहे जिथे प्रत्येक खेळाडू सहकारी असतो. एक काळ असा होता की क्रिकेटमध्ये संघ सहकारी तुमचे मित्र होते. आता ते सहकारी आहेत. यात मोठा फरक आहे. कारण इथे लोकांना स्वतःला पुढे न्यायचे असते. त्यामुळे कोणाला विचारायला वेळ नाही की काय करतोस. हा एकाकी प्रवास आहे.”